गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात प्रशासकीय अधिकारी तथा सहायक प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले नरेश मोहनलाल कनोजिया यांना ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून देण्यात येणारा गुणवंत अधिकारी पुरस्कार (सन 2020-21) प्रदान करण्यात आला. 5 फेब्रुवारी 2024 रोजी वसंतराव नाईक राज्य व्यवस्थापन कृषी व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) नागपूर येथे विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कृत करण्यात आले.
कनोजिया हे सामान्य प्रशासन विभागामध्ये कार्यरत असताना त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन शासनाकडून त्यांना सदर पुरस्कार जाहीर झाला होता. आपल्या 28 वर्षाच्या सेवेचे हे यश असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
त्यांनी या पुरस्काराचे श्रेय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर शेलार, जिल्हा आरोग्य अधिकारी दावल साळवे आणि सर्व खाते प्रमुख, तसेच सोबत काम करणारे सर्व अधिकारी व सहकारी कर्मचारी तसेच आपल्या कुटुंबीयांना दिले आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) फरेन्द्र कुतिरकर यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
गुणवंत अधिकारी कसा असावा?
गुणवंत अधिकारी हा आपले सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना समजून घेणारा असावा, त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या दूर करणारा असावा. आपल्या सहकाऱ्यांना आवश्यक असणारी साधनसामुग्री त्यांना पुरवणे हे त्या अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे असे त्याने मानावे. कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन प्रकरणे कशी निकाली काढता येतील, तसेच कर्मचाऱ्यांमध्ये असलेले कलागुण ओळखून प्रशासनात त्याचा उपयोग करता यावा, अशी प्रतिक्रिया नरेश कनोजिया यांनी व्यक्त केली.