जिल्हा परिषदेच्या प्रांगणात रंगले जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांचे खेळ

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे विद्यार्थ्यांसोबत जेवण

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय अधिकारी-कर्मचारी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते बुधवारी झाले. जि.प.च्या प्रांगणात चार दिवस चालणाऱ्या या खेळात तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये विजेते ठरलेले विद्यार्थी, तसेच जिल्हाभरातील अधिकारी-कर्मचारी आपले कौशल्य दाखविणार आहेत.

यावेळी मंत्री धर्मरावबाबा यांच्यासह आ.कृष्णा गजबे, आ.डॅा.देवराव होळी, ज्येष्ठ नाट्यकलावंत पद्मश्री परशुराम खुणे, तसेच जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल मीना (भाप्रसे), उपजिल्हाधिकारी ओमकार पवार (भाप्रसे), अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एम.भुयार, डीआरडीएचे प्रकल्प संचालक प्रशांत शिर्के, ले.कर्नल (निवृत्त) विक्रम मेहता यांच्यासह जि.प.चे सर्व खातेप्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते. या मान्यवरांनी ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांसोबत टेबलवर जेवण घेत त्यांच्याशी हितगुज केले. यामुळे विद्यार्थीही भारावून गेले होते. बुधवारी सायंकाळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तर गुरूवार आणि शुक्रवारी अधिकारी-कर्मचारी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.

उद्घाटनप्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी क्रिकेटच्या पिचवर हाती बॅट घेऊन चेंडू टोलवण्याचा आनंद घेतला.

वाढीव निधीसाठी प्रयत्न करणार- ना.आत्राम

यावेळी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी सीईओ आयुषी सिंह यांच्या कार्यपद्धतीचा गौरव केला. त्या पालघर येथे असताना आदिवासींच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्यापेक्षाही जास्त प्रयत्न गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासींपर्यंत योजनांचा लाभ देऊन त्या करत आहेत, असे प्रशंसोद्गार धर्मरावबाबा यांनी काढले. त्यांना शासनाकडून पूर्ण सहकार्य मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना चालना देण्यासाठी अशा स्पर्धा दरवर्षी होणे गरजेचे आहे. पण केंद्र, तालुका आणि जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी मिळणारा निधी अपुरा आहे. त्यामुळे हा निधी शासनाने वाढवावा यासाठी क्रीडामंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे यावेळी ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले.

नव्याने उर्जा मिळण्यासाठी असे कार्यक्रम आवश्यक

जिल्हा परिषदेत वर्षभर चालणारे दैनंदिन कामकाज, विविध विकासाच्या योजना राबविताना दररोजच्या धकाधकीत आणि ताणतणावाच्या जीवनातून अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांवरील ताण कमी होऊन नव्याने काम करण्याची उर्जा मिळावी यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असते. तसेच १२ तालुक्यातील सर्व विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी एकत्रित आल्याने त्यांच्यात एकोपा आणि बंधुभावाची जोपासना होण्यासाठी अशा कार्यक्रमांचे मोठे योगदान असते, अशी भावना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी व्यक्त केली.