लोहखनिज वाहतुकीसाठी ८४ किमीच्या विशेष खनिज वाहतूक मार्गाला शासनाची मंजुरी

नवेगाव मोर ते सुरजागडपर्यंत महामार्ग

गडचिरोली : जिल्ह्यातील लॅायड्स मेटल्स व एनर्जी लि.च्या कोनसरी येथील एकात्मिक पोलाद प्रकल्पासह राज्याच्या आणि देशाच्या इतर भागात लोहखनिजाची वाहतूक करण्यासाठी विशेष खनिज वाहतूक मार्गाची उभारणी केली जात आहे. त्यातील नवेगाव मोर ते सुरजागडपर्यंतच्या ८४.६३ किमी लांबीच्या ग्रीनफिल्ड महामार्गाच्या अंतिम आखणीला सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. यासंदर्भात ७ फेब्रुवारीला शासन निर्णय जारी करण्यात आला.

राज्याच्या विकसित भागांशी खनिज संपत्तीची वाहतूक सुरळीतपणे आणि किफायतशिर किमतीत होण्याच्या दृष्टिने गडचिरोली जिल्ह्याला हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, तसेच केंद्र शासनाकडून प्रस्तावित दुर्ग-हैदराबाद या प्रवेश नियंत्रित शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गास जोडल्या जाणार आहे. त्यातून गडचिरोली जिल्ह्यात रोजगार निर्मिती होऊन या भागाच्या सर्वांगिन विकासाला चालना मिळेल, अशी शासनाची भूमिका आहे.

कोनसरीच्या प्रकल्पात सुमारे १५ हजार रोजगार निर्मिती होऊन परिसराचा सामाजिक व आर्थिक विकास होईल. याशिवाय रस्त्यामुळे या भागातील आदिवासी गावांना आरोग्यविषयक सुविधांबरोबर इतर शासकीय योजनांचा लाभ त्वरित मिळण्यास मदत होणार असल्याचे शासनाच्या जी.आर.मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

वाढत्या खनिज वाहतुकीसाठी मुत्तापूर-वडलापेठ- वेलगूर- टोला- येलचिल (इजिमा) या मार्गासोबत आता नवेगाव मोर-कोनसरी-मुलचेरा- हेडरी ते सुरजागड खाणीपर्यंतच्या रस्त्याचे काम हाती घेतले जाणार आहे.