गडचिरोली : देसाईगंजमधील शेतकऱ्यांचे उपोषण गाजत असताना आता गडचिरोलीत ओबीसी युवक विविध मागण्यांसाठी रविवार (दि.४) पासून शहरातील इंदिरा गांधी चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू करणार आहे. शनिवारी पत्रकार परिषदेत या युवकांनी याबाबतची माहिती दिली.
ज्या मागण्यांसाठी हे उपोषण होणार आहे त्यात प्रामुख्याने बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात आणि देशात जातीनिहाय जणगणना करण्यात यावी, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देवू नये, ओबीसी विद्यार्थ्यासाठी मंजूर करण्यात आलेले वसतिगृह तत्काळ सुरु करण्यात यावे, वसतिगृहात प्रवेश न मिळणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांकरिता स्वाधार योजना लागू करण्यात यावी, ओबीसी, एससी, एसटी विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तत्काळ देण्यात यावी, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसीचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत लागू करण्यात यावे, शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्या, जिल्ह्यातील ग्रामीण भागात दळणवळणाची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने नव्या 200 बसेस देण्यात याव्या, सुरजागड व कोनसरी प्रकल्पात जिल्ह्यातीलच युवकांना प्राधान्य देण्यात यावे, ओबीसी शेतकऱ्यांच्या वनहक्क पट्ट्यासाठी लागणारी तीन पिढ्यांची अट रद्द करण्यात यावी, राज्याच्या अर्थसंकल्पात ओबीसी समाजाला देण्यात आलेला निधी अत्यल्प असून त्यात वाढ करण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.
पत्रपरिषदेला राहुल भांडेकर, पद्माकर भुरसे, आकाश आंभोरकर, अनुप कोहळे, अभिषेक कॅालनी, मनोज पिपरे, प्रफुल्ल आंभोरकर, संतोषी सुत्रपवार, पंकज खोबे हे प्रामुख्याने उपस्थित होते.