भंडारेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवाची जय्यत तयारी, सोनाली कुलकर्णी येणार

महाअभिषेकासह वैरागडात भजन स्पर्धा

गडचिरोली : जिल्ह्यातील वैरागडजवळच्या प्रसिद्ध भंडारेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. दि.८ आणि ९ मार्च असे दोन दिवस भोलू सोमनानी व मित्र परिवाराच्या वतीने महाअभिषेक, भजन स्पर्धा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.८ ला सकाळी ९ वाजता भंडारेश्वर मंदिर येथे महाअभिषेक होणार आहे. सायंकाळी ६ वाजता भजन स्पर्धेचे उद्घाटन वैरागडच्या सरपंच संगीता पेंदाम, उपसरपंच भास्कर बोडणे यांच्या हस्ते होणार आहे.

दि.९ ला दुपारी ३ वाजता महाहवनाला सुरूवात होईल. सायंकाळी ४ वाजता सिनेतारका सोनाली कुलकर्णी यांच्यासह इतर पाहुण्यांचे आगमन होईल. त्यानंतर ५ वाजता गोपालकाला होऊन सायंकाळी ६ पासून महाप्रसादाला सुरूवात होणार आहे. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते परिसरातील ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व सदस्य, तथा सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांसह नाट्य कलावंतांचा सत्कार होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन भोलू सोमनानी, ग्रामपंचायत सदस्य शितल सोमनानी आणि मित्र परिवार वैरागड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

भजन स्पर्धेसाठी १०,००१ रुपये, ८००१ रुपये, ६००१ रुपये, ४००१ रुपये आणि २००१ रुपये रोख असे पाच बक्षीस ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ७७७३९५६८४४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.