देसाईगंज : राज्याचे विरोधीपक्ष नेता विजय वडेट्टीवार यांनी रविवारी वीज पुरवठ्यासाठी देसाईगंज येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी त्यांनी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तीन दिवसांच्या आत आंदोलक शेतकऱ्यांची समस्या मार्गी लावा, अन्यथा शेतकऱ्यांसोबत आम्हीही रस्त्यावर उतरून हे आंदोलन अधिक तीव्र करू. त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यास होणाऱ्या परिणामांची जबाबदारी सर्वस्वी आपली राहिल, असा इशाराही ना.वडेट्टीवार यांनी दिला.
यावेळी उपोषण मंडपात आ.कृष्णा गजबे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, प्रदेश सरचिटणीस डॅा.नामदेव किरसान, माजी आमदार रामकृष्ण मडावी, शिवसेना (उबाठा)चे सुरेंद्रसिंह चंदेल, माजी सभापती परसराम टिकले, छगन शेडमाके, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, माजी उपसभापती नितीन राऊत, कोंढाळ्याच्या सरपंच अपर्णा राऊत, काँग्रेस कार्यकर्ते रामदास मसराम, माजी युवक काँग्रेस शहराध्यक्ष पिंकू बावणे प्रामुख्याने उपस्थित होते.
तालुक्यातील जुनी वडसा वार्डालगतच वीज निर्मीती कारखाना असून या कारखान्यातून उत्पादित केलेली वीज इतरत्र पुरवली जाते. मात्र राखेचा मारा स्थानिक शेतकऱ्यांना खावा लागत आहे. असे असुनसुद्धा येथील शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना किमान १२ तास वीज पुरवठा करण्यात येऊ नये, ही शोकांतिका आहे असे ना.वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी १३ फेब्रुवारी रोजी वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयावर दिवसा किमान १२ तास अखंडित वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी धडक दिली. आमदार कृष्णा गजबे यांनी उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून तीन दिवसांत समस्या मार्गी लागणार असल्याचे सुतोवाच केले होते. मात्र तब्बल १८ दिवस लोटूनही या समस्येवर तोडगा काढण्यात आलेला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी वीज कंपनीवर मोठी नाराजी व्यक्त केली.
शेतातील पिकांना पाण्याची गरज असताना पाण्याअभावी शेतातील उभे पिक करपू लागले आहे. त्यामुळे उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर श्याम मस्के यांनी २६ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. याशिवाय इतर शेतकरी साखळी उपोषण करीत आहेत.
खरीप हंगामात १२ तास वीज पुरवठा करण्यात येत असल्याने उपलब्ध सिंचन सुविधेच्या भरवशावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धान, मका तसेच भाजीपालावर्गीय पिकांची लागवड केली. मात्र ऐन पिकाला पाण्याची गरज असताना शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना अपुरा वीज पुरवठा सुरू आहे. शासन-प्रशासन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत असल्याचा आरोप ना.वडेट्टीवार यांनी केला.
मंत्री, प्रशासनाकडून दिशाभूल?
दरम्यान अर्थसंकल्पिय अधिवेशनावरून परत आलेल्या आमदार कृष्णा गजबे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. वास्तविक आमदार गजबे हे या क्षेत्राचे लोकप्रतिनीधी म्हणून त्यांची जबाबदारी पार पाडत असले तरी विभागाचे मंत्री आणि वीज प्रशासन दिशाभूल करीत असल्याने त्यांचाही नाईलाज होत आहे, अशा प्रतिक्रिया उपस्थितांमध्ये उमटत होत्या.