गडचिरोली : बँक म्हणजे ग्राहकांचे पैसे सांभाळणारी किंवा त्यांना कर्ज देणारी यंत्रणा, अशी नागरीकांमध्ये ओळख आहे. पण एक पाऊल पुढे जात आपल्या खातेधारकांच्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार देण्याचा नवा आदर्श ॲक्सिस बँकेने ठेवला आहे.
दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी गडचिरोली पोलिस दलात कार्यरत कर्मचारी विनोद नंदाजी निकोडे यांचे यकृताच्या दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर मोठे संकट ओढवले. निकोडे हे अॅक्सिस बँकेचे खातेदार होते. त्यामुळे बँकेने मदतीचा हात पुढे करीत त्यांच्या पश्चात पत्नी लोचना विनोद निकोडे यांना आर्थिक स्वरुपात मदत देण्याचे निश्चित केले. अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांच्या हस्ते सोमवारी (दि.4) निकोडे कुटुंबियांना 10 लाख रुपयांचा धनादेश अदा करण्यात आला.
यावेळी अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अॅक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक राकेश राजेंद्र वल्लालवार व उपशाखा व्यवस्थापक मुरलीधर नैताम प्रामुख्याने उपस्थित होते.