गडचिरोली : गडचिरोलीत मंगळवारी महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपचे खा.अशोक नेते यांचे नामांकन दाखल करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन भरण्यात आले. दुसरीकडे खा.नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून शहरातील अभिनव लॅानपर्यंत वाजतगाजत रॅली काढल्यानंतर त्या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात आली.
‘ही निवडणूक उमेदवारांची नसून मोदीजी विरूद्ध राहुल गांधी अशी आहे, तुम्हाला कोण हवंय’, असा सवाल करत ना.देवेंद्र फडणवीस यांनी ‘मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या,’ असे आवाहन जाहीर सभेत केले.
यावेळी मंचावर ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सा.पोरेड्डीवार, आ.डॅा.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, आ.बंटी भांगडिया, माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, माजी आ.आशिष देशमुख, प्रकाश सा.पोरेड्डीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हेमंत जंबेवार, जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्यासह भाजपचे गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष, आणि भाजपचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीची उमेदवारी जाहीर करण्यासाठी विलंब लागण्याचे कारण सांगितले. ते म्हणाले, आम्ही बघत होतो की किती लोक खा.नेते यांच्या पाठिशी आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी रोज निवेदने येत होती. आता त्यांच्या विजयाची जबाबदारी तुमची आहे, अशोक नेते यांना मत म्हणजे देवेंद्रजी आणि मोदीजींना मत असल्याचे ते म्हणाले.
ना.धर्मरावबाबा म्हणाले, उमेदवारी कोणालाही मिळाली तरी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहू, असे मी आधीच स्पष्ट केले होते. केंद्रात पुन्हा एनडीएचे सरकार आणून पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींना बसवायचे असा निश्चय करून या निवडणुकीला सामोरे जा, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी इतरही मान्यवरांनी मार्ददर्शन केले.