वंचित बहुजन आघाडीतर्फे नागभिडचे हितेश मडावी निवडणूक रिंगणात

किती प्रभाव पाडणार हे अनिश्चित

गडचिरोली : महाविकास आघाडीत समावेशासाठी अपेक्षित जागा मिळण्यावरून अनेक दिवसांपासून अडून बसलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने गडचिरोलीतही उमेदवार दिला आहे. आता त्यांचा निवडणुकीतील अर्ज कायम राहतो की ते माघार घेतात हे 30 मार्च रोजी स्पष्ट होईल.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून हितेश मडावी यांनी शेवटच्या दिवशी नामांकन भरले. ते चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभिड तालुक्यातील नांदेड या गावचे रहिवासी असून उच्च माध्यमिक शिक्षक आहेत. राजकारणात फारसे सक्रिय नसल्यामुळे गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यासाठी ते नवखे आहेत. त्यामुळे उमेदवारी कायम ठेवली तरी ते मतदारांवर किती प्रभाव पाडतील याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश गजबे यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. गजबे हे राजकारणात आधीपासून सक्रिय असल्याने त्यांना तेवढे मतदान पडण्यामागे त्यांचा वैयक्तिक जनसंपर्क आणि सामाजिक चळवळीतील योगदान अधिक महत्वाचे होते. प्रा.मडावी हे नवखे आहेत. महाविकास आघाडीसोबत दिलजमाई न झाल्याने वेळेवर त्यांना या मतदार संघात उभे केल्याचे दिसते. सिरोंचा ते आमगाव या भलामोठ्या मतदार संघातील 25 टक्के गावंही नवीन उमेदवाराला निवडणुकीदरम्यान पिंजून काढणे शक्य होत नाही. अशा स्थितीत मतदारांनी कोण हे प्रा.मडावी? असा सवाल केल्यास आश्चर्य वाटणार नाही.