गडचिरोली : दुसऱ्यांच्या प्रवास भत्त्याच्या बिलाची रक्कम स्वत:च्या खात्यात वळती करून तब्बल 1 कोटी 46 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या चार लिपिकांनी विद्यापीठ प्रशासनाने निलंबित केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तीन लिपिकांना अटक करण्यात आली होती, तर एका महिला लिपिकावरही गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान अटकेतील तीनही आरोपींना न्यायालयाने 10 जूनपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. त्याची मुदत सोमवारी भरत असल्याने पु्न्हा त्यांना न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे.
गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य, विविध प्राधिकरणाचे सदस्य, तसेच प्राध्यापकांच्या प्रवास भत्त्याच्या बिलाची रक्कम त्यांच्या खात्यात न टाकता स्वत:च्या खात्यात वळती करून या लिपिकांनी 1 कोटी 46 लाखांचा अपहार केल्याचे उघडकीस आले होते. डल्ला मारण्याचा चार लिपिकांचा डाव फसला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यातील महेंद्रकुमार उसेंडी (37 वर्ष), अमित जांभुळे (38 वर्ष) आणि अमोल रंगारी (36 वर्ष) या तीन लिपिकांना अटक करण्यात आली, तर प्रिया पगाडे या महिला लिपिकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.