धान खरेदी घोटाळ्यातील आणखी एका आरोपीला अटक, संख्या झाली तीन

ग्रेडरला 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी

गडचिरोली : उपप्रादेशिक कार्यालय घोटअंतर्गत मार्कंडा (कन्सोबा) येथील धान खरेदी केंद्रात वर्ष 2022-2023 मध्ये झालेल्या धान घोटाळ्यातील आरोपींची संख्या तीन झाली आहे. यापूर्वी दोन आरोपींना अटक केल्यानंतर घोट येथील आदिवासी विकास महामंडळाचा प्रतवारीकार तथा विपनन निरीक्षक राकेश मडावी (34 वर्ष) यालाही अटक करण्यात आली. त्याला 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

मडावी याला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्याचा गुन्ह्रातील सहभाग निष्पन्न झाला. त्यामुळे त्याला अटक करुन प्रथम वर्ग न्यायालय, चामोर्शी येथे हजर केले असता, न्यायालयाने दिनांक 15 जून 2024 पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. हे प्रकरण धान खरेदी घोटाळ्याशी संबंधित असल्याने आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणत्या आरोपींची नावे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आतापर्यंत ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात, पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात, सपोनि राहुल आव्हाड, पोउपनि सरीता मरकाम तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार यांनी केली.