अहेरी : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या जीवनावरील ‘धर्मरावबाबा, दिलों का राजा’ हा लघुचित्रपट शुक्रवारी मोठ्या उत्साहात आणि चाहतावर्गाच्या प्रचंड गर्दीत प्रदर्शित करण्यात आला. या कार्यक्रमाला स्वत: धर्मरावबाबा यांच्यासह मध्यप्रदेशचे जनजाती कल्याणमंत्री विजय शहा, सिने अभिनेत्री ईशा कोप्पीकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, चित्रपट निर्मात्या नितू जोशी, दिग्दर्शक भूषण चौधरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमांजवळ आपल्या भावना व्यक्त करताना ना.धर्मरावबाबा म्हणाले, माझ्या जीवनातील हा अविस्मरणीय क्षण आहे. लघुचित्रपट बघितल्यानंतर जुन्या आठवणी ताज्या झाल्या. गडचिरोली जिल्हा व प्रामुख्याने अहेरी उपविभाग विकासापासून कोसो दूर होता. शिक्षण, सिंचन, आरोग्य, रस्ते, वीज, रोजगार हे ध्येय व मिशन घेऊन राजकारणात पदार्पण केले, पण त्यासाठीही मोठ्या अडचणी आल्या, त्या अडचणींना मात देऊन ‘मिशन’ पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
अहेरीतील हकीम लॉनच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला लोकांनी मोठी गर्दी केली होती. सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून आणि पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या लघुपटात धर्मरावबाबा यांच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यात पहिल्यांदा आमदार बनल्यापासून तर नक्षलवाद्यांनी केलेले अपहरण, सुटका आणि त्यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
प्रास्ताविकातून सुरेंद्र अलोणे यांनी ‘धर्मराव बाबा, दिलों का राजा’ या लघुचित्रपटासह मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या विविध कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन पूर्वा दोंतुलवार यांनी केले. यावेळी गैरसोयी होऊ नये म्हणून सभागृहाबाहेर एलसीडी स्क्रिन लावण्यात आली होती.