मागास जिल्हा ही नकोशी वाटणारी ओळख पुसून टाकण्यासाठी कटीबद्ध

स्वातंत्र्यदिन सोहळ्यात जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन

गडचिरोली : केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत. या कामांतून गडचिरोलीची मागास जिल्हा ही जुनी नकोशी वाटणारी ओळख पुसून नवीन ओळख आपल्याला निर्माण करायची आहे. येथील लोहप्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्याला ‘स्टील हब’ ही नवी ओळख मिळत आहे. सर्वसामान्य जनतेचा सर्वांगीण विकास हे ध्येय ठेवून राज्य शासनाने अनेक महत्वपूर्ण योजना सुरू केल्या आहेत. या सर्व जनकल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यत पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा तत्पर आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले.

स्वातंत्र्यदिनी मुख्य शासकीय सोहळ्यात जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करत होते. कार्यक्रमाला खा.डॉ.नामदेव किरसान, आ.डॉ.देवराव होळी, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, सहायक जिल्हाधिकारी राहुल मीना, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्यासह इतर अधिकारीगण प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, जिल्ह्यात रस्ते, रेल्वे, विमानतळ, उद्योग आणि इंटरनेट-मोबाईल नेटवर्क यांसारख्या पायाभूत सुविधांना बळ देवून महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांची मालिका सुरू आहे. गडचिरोली जिल्हा राज्यातील प्रगतीचे आणि संधीचे क्षेत्र म्हणून उदयास येत आहे. शासनाच्या या उपक्रमांचा येथील प्रत्येक नागरिकाला लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील दीड लाख महिलांचे अर्ज राज्यातून सर्वप्रथम मंजूर करून शासनाकडे पाठवण्यात आले. त्यातील इ-केवायसी पूर्ण झालेल्या भगिनींच्या खात्यात एक-दोन दिवसांतच पैसे मिळण्यास सुरूवात होईल. ही योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवित असल्याबद्दल त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर 641 कोटी नियतव्ययापैकी 213 कोटी निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. यातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विकास कामे मार्गी लावण्यात येतील. या वर्षात चामोर्शी तालुक्यातील हल्दीपुराणी उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्याने 22 गावांना सिंचनाची सोय झाली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगाराची मागणी केलेल्या तब्बल 85 हजार कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला आणि जिल्ह्यात चालू वर्षात 25 लक्ष मनुष्यदिन निर्मिती साध्य करण्यात आली. आगामी गौरी-गणपती उत्सवानिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून नुकसान-भरपाई मिळण्यासाठी शासनाकडे शिफारस केली आहे. पूर परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन विभागाने चांगली कामगिरी केल्याबद्दल दैने यांनी त्यांचे अभिनंदन केले. लोकसभा निवडणूक प्रथमच निर्विघ्नपणे पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. लोकसभेच्या निवडणूकीत येथील 72 टक्के मतदारांनी मतदानाचे कर्तव्य चोखपणे बजावले. आगामी विधानसभा निवडणुकीत यापेक्षाही जास्त टक्केवारी प्राप्त करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

विविध कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच चुरचुरा येथे पूरात वाहून जाणाऱ्या तीन व्यक्तींचे प्राण वाचवणाऱ्या अनिल गेडाम व स्थानिक नागरिकांचा विशेष गौरव करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले. या कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी उपस्थित होते.