पहिल्या ओबीसी वसतिगृहाचे उद्घाटन, मुला-मुलींसाठी प्रत्येकी 100 खाटा

शिक्षण हीच खरी संपत्ती- ना.आत्राम

गडचिरोली : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोलीत ओबीसी मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आले. त्याचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षण हे प्रगतीचे दार आहे, ते तुम्हाला कधीही रिकामे बसू देणार नाही. ही एक अशी संपत्ती आहे जी तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षण घेवून वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमवा, असा मोलाचा सल्ला यावेळी धर्मरावबाबा आत्राम यांनी विद्यार्थ्यांना दिला.

या कार्यक्रमाला खासदार डॉ.नामदेव किरसान, मा.खा.अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी, जात पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुदन धारगावे, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी चेतन हिवंज, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मंत्री आत्राम यांनी सांगितले की, शिक्षणाचा प्रसार आणि रोजगार उपलब्धता हा आपला मुख्य अजेंडा आहे. त्यासाठी नियमित कार्यरत राहील. जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शहरात येवून उच्च शिक्षण घेणे सोयीचे व्हावे म्हणून शासनातर्फे येथे इतर मागासवर्गीय मुला-मुलींकरता वसतिगृह सुरू करण्यात आले. या वसतिगृहाचे उद्घाटन करताना मला आनंद होत आहे. सध्या या वसतिगृहात मुलींसाठी 100 आणि मुलांसाठी 100 जागांची प्रवेश क्षमता आहे. जिल्ह्यात इतर मागासवर्गीय नागरिकांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वसतिगृहातील ही प्रवेश क्षमता वाढीसाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महायुती सरकारकडून सर्व समाजघटकांसाठी राबविल्या जात असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

खासदार डॉ.किरसान यांनी वसतिगृहामुळे शिक्षण घेण्याच्या मिळालेल्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी अशोक नेते या वसतिगृहांसाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यांची माहिती दिली. तसेच तालुकास्तरावरही ओबीसी वसतिगृहांची उभारणी करण्याची आवश्यकता व्यक्त केली. यावेळी डॉ.नामदेव उसेंडी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

बारावीनंतरच्या पुढील शिक्षणासाठी या वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार असल्याचे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी सांगितले. यावेळी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील 17 मुले व मुलींची आणि वाचनालयातील 7 विद्यार्थ्यांची गडचिरोली पोलिस दलात निवड झाली, यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री युवा रोजगार प्रशिक्षण योजनेअंतर्गत 3 प्रशिक्षणार्थींना समाजकल्याण विभागात प्रशिक्षणासाठी रुजू आदेश देण्यात आले. मंत्री धर्मरावबाबा आत्राम व मान्यवरांनी वसतिगृहाची पाहणी केली.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे रविंद्र वासेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, शिवसेनेचे हेमंत जंबेवार, भाजपचे गोवर्धन चव्हाण तसेच समाजकल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.