गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागातील आलापल्ली ते सिरोंचा मार्गावरच्या रेपनपल्लीजवळ पोलिसांनी एका मालवाहू वाहनातून सुरू असलेली दारूची तस्करी रोखली. त्या मालवाहू वाहनात तब्बल 17 लाख 57 हजार रुपयांची देशी दारू होती. विशेष म्हणजे वाहनाचा चालक आणि त्याचा सहकारी असे दोघेही पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातले रहिवासी आहेत. दारू वाहतुकीसाठी वापरलेले वाहन आणि दारूची खेप पोहोचविणारे दोघेही आरोपी लांबच्या जिल्ह्यातील असल्यामुळे पोलीसही सावध झाले आहेत. पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी आणि कोणाला संशय येऊ नये यासाठी त्यांचा वापर दारू तस्करीसाठी केला जात असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तोंडावर येऊन पोहोचलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैधरित्या आणि छुप्या पद्धतीने दारुची वाहतूक करून साठा केला जात आहे. त्याला रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. त्यानुसार दि.28 च्या रात्री ट्रक (क्र.एम एच 12, एफझेड 8931) मधून काही लोक अहेरी ते सिरोंचा मार्गाने अवैधरित्या दारुची वाहतूक करणार असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर जिमलगट्टाचे उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत दसूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेपनपल्लीचे प्रभारी अधिकारी पोउपनि. संतोष काजळे यांच्या नेतृत्वात एक पथक रवाना करण्यात आले. या पथकाने कमलापूर टी-पॅार्इंटजवळ सापळा रचला.
सकाळी 6 वाजताच्या दरम्यान एक संशयित ट्रक भरधाव वेगाने येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबवून चालकासह सहकाऱ्याची माहिती विचारली. त्यातील एकाचे नाव संजय महिपत सावंत (51 वर्षे, रा.मुंढे, ता.कराड, जि.सातारा) तर सहकाऱ्याचे नाव सुनील प्रकाश पवार (32 वर्ष, रा.जैसिंगपूर, ता.शिरोड, जि.कोल्हापूर) असे सांगितले.
पंचासमक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता, त्यात 90 एम.एल. रॉकेट संत्रा डिस्टिलरी देशी दारुचे 502 बॉक्स (प्रतिबॉक्स 100 नग प्रमाणे एकुण 50 हजार 200 नग रॉकेट देशी दारुच्या बॉटल (किंमत अंदाजे 17 लाख 57 हजार रुपये) असा मुद्देमाल सापडला. त्या दारूच्या बॅाक्ससह टाटा कंपनीचे ते मालवाहू वाहन जप्त करण्यात आले.
आरोपी चालक संजय महिपत सावंत व सहकारी (क्लिनर) सुनील प्रकाश पवार यांच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला. ही कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिमलगट्टाचे एसडीपीओ शशिकांत दसुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी संतोष काजळे, पो.उपनिरिक्षक सतीश पवार, प्रियंका मेश्राम आणि इतर अंमलदारांनी पार पाडली.