गडचिरोली : तालुक्यातील गोविंदपूर येथील माया धर्माजी सातपुते या महिलेचा शुक्रवारी वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. या सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर खासदार अशोक नेते यांनी शनिवारी गोविंदपूरला जाऊन मृत महिलेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी खासदार नेते यांच्या हस्ते आर्थिक मदतही देण्यात आली.
खासदार नेते यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना या घटनेमुळे सभोवतालच्या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वाघाला लवकरात लवकर जेरबंद करा, असे निर्देश वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच गावकऱ्यांनी जंगलात किंवा शेतावर जाताना एकटेच न जाता समुहाने जावे, सोबत हातात काठी घेऊन जावे आणि सावधगिरी बाळगावी, अशा सूचना याप्रसंगी त्यांनी दिल्या.
याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, गडचिरोली वनविभागाचे उपसंरक्षक अधिकारी मिलिश शर्मा, महिला आघाडीच्या जिल्हा सचिव लक्ष्मी कलंत्री, सेवानिवृत्त उपनिरिक्षक कान्होजी लोहंबरे, उपसरपंच प्रितम गेडाम, रवी मोहुरले, किसन गेडाम, शंकर मेश्राम, प्रकाश नैताम, विलास पिपरे, लोमेश कोहळे तसेच मोठ्या संख्येने गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला भगिनी आणि वन अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.