शासकीय योजनांची एकत्रित माहिती देणारी पुस्तिका तयार करणार

दुर्गम गावांत साधला संवाद, पहा व्हिडीओ

लाहेरीजवळच्या बेली ब्रिजची पाहणी करताना अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे.

गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण गडचिरोलीमधील अनेक गावे दुर्गम क्षेत्रात मोडतात. या क्षेत्राचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी, शासकीय योजनांमध्ये सक्रिय जनसहभाग सुनिश्चित करण्यासाठी आणि शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी, सर्व शासकीय विभागांच्या योजनांची एकत्रित माहिती पुस्तिका (Booklet) सर्वसामान्य जनतेपर्यंत, प्रत्येक गाव आणि ग्रामपंचायत तथा गोटुल स्तरावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. अहेरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी या भागातील अतिदुर्गम भागाचा दौरा करत तेथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी अनेक गावातील नागरिक शासनाच्या योजनांपासून अनभिज्ञ असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

अपर जिल्हाधिकारी भाकरे यांनी भामरागड तालुक्यातील मलापोडूर, गोपनार या अतिदुर्गम गावांना भेटी दिल्या. तसेच लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. अपूर्णावस्थेत असलेल्या बेली ब्रिजच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधताना त्यांना भाषेची समस्या जाणवत होती. यावेळी होडरीचे सरपंच किशोर कलंगा यांनी मराठीचे गोंडी आणि माडिया भाषेमध्ये भाषांतर करून नागरिकांना समजावून सांगितले. यावेळी संवर्ग विकास अधिकारी स्वप्निल मगदूम हेसुद्धा त्यांच्यासोबत होते.

हेडरी उपविभागात येणारे अहेरी, भामरागड, एटापल्ली आणि सिरोंचा हे तालुके अतिदुर्गम, आदिवासीबहुल आणि नक्षलदृष्ट्या संवेदनशिल आहेत. या भागात सर्व शासकीय विभागांमार्फत अनेक योजना राबविण्याची कार्यवाही केली जाते. मात्र तरीही काही दुर्गम गावांमध्ये नागरिकांशी संवाद साधना तेथील नागरिकांना योजनांची परिपूर्ण माहिती नसल्याचे विजय भाकरे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे योजनांची एकत्रित माहिती देणारी पुस्तिका त्यांना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दुर्गम गावातील वैयक्तिक व सामूहिक स्वरूपाच्या समस्या निराकरणासाठी तक्रार नेमकी कोणाकडे करायची, ही माहितीसुद्धा नागरिकांना माहित नसल्याचे निदर्शनास आल्याने त्याबाबतची माहिती देणारे माहिती फलक तयार करून गावात दर्शनी भागी लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सर्व दुर्गम गावांमध्ये असे फलक लावले जाणार आहे.