दुर्गम भागातील गोरगगरीब नागरिकांना मिळाली सीआरपीएफची ऊब

192 बटालियनकडून ब्लँकेटचे वाटप

गडचिरोली : आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग असलेल्या हालेवारा परिसरातील गावांमधील गोरगरीब नागरिकांना थंडीपासून बचावासाठी ब्लँकेटचे वाटप केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) डी-192 बटालियनकडून करण्यात आले.

अतिसंवेदनशिल नक्षलग्रस्त भाग असणाऱ्या हालेवारा, पेठा, पुन्नूर, वट्टेगट्टा, कामके, मोहगाव, ताडापल्ली, धुसगुडा या गावांमधील गरजवंत नागरिकांना बटालियन कमांडंट परविंदर सिंह यांच्या हस्ते ब्लँकेटस् वाटण्यात आले. यावेळी उपकमांडंट नीरज अवस्थी, सहायक कमांडंट टुपेशकुमार चौधरी, हालेवाराचे प्रभारी पो.उपनिरीक्षक अक्षय पाटील, पो.उपनिरीक्षक नागेश डी.शेट्टीवार, उपनिरीक्षक गोकुल डी.हाबेराव, पो.पाटील घुटा मुरा मटामी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी जवळपास ४०० लोकांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होऊन ग्रामीण भागातील वातावरण आणि सुरक्षा सुस्थितीत ठेवण्यासाठी सहकार्य केले.