गडचिरोली जिल्हा काँग्रेस करणार वनमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

वाघ आणि हत्तींच्या बंदोबस्ताची मागणी

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात जंगली हत्ती आणि नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात वाढ झालेली आहे. त्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा जीवही जात आहे. सोबतच अनेक गावातील शेतीचेही नुकसान होत असल्याने जंगली हत्ती आणि नरभक्षक वाघांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जिल्हा काँग्रेसच्या वतीने वारंवार मागणी करूनही वनविभाग, पालकमंत्री आणि वनमंत्र्यांनी अद्यापही तोडगा न काढल्यामुळे आता थेट वनमंत्र्यांच्या घरासमोर 30 नोव्हेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी कळविले.

सोमवारी ब्राह्मणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्राम भवनात घेण्यात आली. यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ.नामदेव किरसान, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, शहर अध्यक्ष सतीश विधाते यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.