घरोघरी संविधान पोहचविणे अत्यावश्यक, एसडीओ वाघमारे यांचे प्रतिपादन

अहेरीत लक्षवेधक संविधान सन्मान रॅली

मार्गदर्शन करताना एसडीओ वैभव वाघमारे, मंचावर पो.निरीक्षक काळबांडे व इतर.

अहेरी : संविधानाचे महत्त्व लक्षात घेता संविधान घरोघरी पोहचविणे अत्यावश्यक असून त्यासाठी व्यापक स्वरूपात जनजागृती व्हावी, असे मत येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे (भा.प्र.से.) यांनी केले. 26 नोव्हेंबर या संविधान दिनी संविधान फाऊंडेशन नागपूर, शाखा अहेरी आणि इतर सहयोगी संघटनांच्या वतीने आयोजित संविधान सन्मान रॅलीच्या समारोपीय कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी अहेरी पोलिस स्टेशनचे निरीक्षक मनोज काळबांडे, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.विजय खोंडे, अहेरी पत्रकार संघटनेचे सचिव सुरेंद्र अलोणे, प्रा.रमेश हलामी, ॲड.प्रिती डंबोळे, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षिका जयश्री खोंडे, अॅड.पंकज दहागावकर, अहेरी आगाराचे वाहतूक निरीक्षक कुवेलाल तिलगामे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर सडमेक आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी इतरही पाहुण्यांनी मार्गदर्शन करून संविधानाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी शिक्षक हेमंत बोरकर यांनी संविधानावर आधारित भावगीत सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून झाली. त्यानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांनी संविधान सन्मान रॅलीला हिरवी झेंडी दाखविली.

रॅलीत होर्डिंग्ज, संविधानावर आधारित भावगीत व घोषवाक्याने अहेरी नगरी अक्षरशः दुमदुमली. समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश मडावी यांनी तर संचालन वनिता कन्नाके यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने प्रतिष्ठित नागरिक, संविधान प्रेमी, प्राध्यापक व शिक्षकवृंद, युवक-युवती, विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी तालुका विधी सेवा समिती, अहेरी पत्रकार संघटना, भगतसिंग फॅन्स क्लब, लक्ष्य अकॅडमी, आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, समता सैनिक दल व अन्य संघटनांनी सहकार्य केले.