गडचिरोली : दारूबंदीच्या आड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे येणाऱ्या दारूचे आणि विषारी दारू गाळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या फसव्या दारूबंदीची समितीमार्फत समीक्षा करा, अशी मागणी महाराष्ट्र ट्रायबल अँड बॅकवर्ड पिपल्स अॅक्शन कमिटीच्या वतीने डॅा.प्रमोद साळवे यांनी सहपालकमंत्री अॅड.आशिष जयस्वाल यांच्याकडे निवेदन देऊन केली. त्याला ना.जयस्वाल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले जाते.
सदर कमिटीच्या वतीने अध्यक्ष डॅा.प्रमोद साळवे, धानोरा तालुका प्रमुख नारायण सयाम, सचिव अनिल मेश्राम, चातगावचे प्रमुख मारोती कोसरे यांनी सदर निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे पाठविले आहे. तसेच सहपालकमंत्री ना.जयस्वाल यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली.
आदिवासीबहुल, मागास गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. मात्र त्या योजनांचा लाभ खऱ्या गरजवंतांपर्यंत पोहोचतच नाही. काही लोक दारूबंदीच्या आड आपला स्वार्थ साध्य करतात. पण समाजसेवेच्या आड उद्योगधंद्यांना विरोध केला जात असल्याने जिल्ह्यात बेरोजगारी वाढली असून युवा वर्गात नैराश्य पसरून ते वाममार्गाला लागले आहेत. अवैधरित्या चालणाऱ्या दारू व्यवसायात बेरोजगार युवकांसह काही महाविद्यालयीन आणि शाळकरी विद्यार्थीही गुंतले आहेत.
विशेष म्हणजे दारूबंदी असल्याने छुप्या मार्गाने डुप्लिकेट आणि विषारी दारूही जिल्हावासियांच्या माथी मारली जात आहे. यातून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दारूबंदी नसताना आणि दारूबंदी लागू झाल्यानंतर नागरिकांच्या आरोग्याच्या समस्यांमध्ये किती वाढ झाली याची तपासणी करण्यासाठी तसेच गुन्ह्यांचे प्रमाण किती वाढले याची तपासणी करण्यासाठी समीक्षा समिती नेमावी, अशीही मागणी डॅा.साळवे यांनी केली आहे. दारूबंदी केवळ दारू तस्करीत गुंतलेल्या लोकांना गब्बर करणारी ठरली असून त्यात सामान्य नागरिकांची निव्वळ लूट होत आहे. त्यामुळे या दारूबंदीचा पुनर्विचार करणे गरजेचे असून दारूबंदीचा फायदा काय झाला याची समीक्षा शासनाने करावी, अशी मागणी कमिटीच्या वतीने करण्यात आली. या चर्चेनंतर त्यावर विचार करण्याबाबत ना.जयस्वाल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.