वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाच्या कामाला मा.खा.अशोक नेते यांनी दिली भेट

गडचिरोली : गडचिरोली ते वडसा रेल्वेमार्गाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि प्रकल्पाला गती देण्यासाठी माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) अशोक नेते यांनी प्रजासत्ताक दिनी भेट देऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. नेते यांनी गोगाव, साखरा व पोर्ला या ठिकाणच्या साईटची प्रत्यक्ष पाहणी करून स्थिती जाणून घेतली. यावेळी प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पुढील दिशादर्शक उपाय सुचवले.

गडचिरोली ते वडसा रेल्वे प्रकल्प जिल्ह्याच्या आर्थिक व सामाजिक विकासाला चालना देणारा मानला जातो. या प्रकल्पामुळे वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होऊन रोजगार निर्मितीच्या नवीन संधी निर्माण होतील. गडचिरोलीच्या दुर्गम भागातील विकासासाठी या रेल्वेमार्गाचे मोठे योगदान ठरेल. नेते यांनी या प्रकल्पाला गती देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात या रेल्वेमार्गाच्या प्रत्यक्ष उभारणीला सुरूवात झाली. मात्र काही दिवसांपासून काही तांत्रिक कारणांमुळे या प्रकल्पाचे काम संथगतीने चालू आहे. त्यामुळे नेते यांनी त्यातील अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाय सूचविले. तसेच शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, ॲड.संदीप धाईत, रेल्वेचे वरिष्ठ खंड अभियंता आर.पी.सिंग, प्रकल्प व्यवस्थापक अरुण जैन प्रामुख्याने उपस्थित होते.