अखंडित वीज पुरवठ्यासाठी कुरखेडात शेतकऱ्यांचा मोर्चा व ठिय्या आंदोलन

काँग्रेस आणि सेनेचे (उबाठा) नेतृत्व

कुरखेडा : उन्हाच्या झळा वाढत असताना भारनियमनामुळे त्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी एसडीओ कार्यालयावर मोर्चा काढला. काँग्रेस आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात काढलेल्या या मोर्चात कृषीपंपांसह घरगुती वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा देण्याची मागणी करण्यात आली.

हा मोर्चा एसडीओ कार्यालयावर पोहोचल्यानंतर ठिय्या आंदोलन करत राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

कृषीपंप तसेच घरगुती विद्युत वाहिनीवर मागील काही दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या भारनियमनामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी गांधी चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय कंपनी विरोधात घोषणाबाजी करीत मोर्चा काढला व कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले.

घोषित भारनियमनाचा कालावधी संपल्यानंतरही अनेक ठिकाणी वारंवार होणाऱ्या विद्युत बिघाडामुळेसुद्धा पुरवठा बंद असतो. त्यामुळे‌ कृषी पंपातून रब्बी धानाचा हंगाम धोक्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व शिवसेना (उबाठा) यांच्या नेतृत्वात मोर्चा व ठिय्या आंदोलन केले.

मोर्चाचे नेतृत्व आ.अभिजीत वंजारी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, काँग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ.नामदेव किरसान, माजी आमदार आनंदराव गेडाम, रामदास मसराम, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, वामनराव सावसागडे, नगराध्यक्ष अनिता बोरकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जीवन नाट, तसेच जयंत हरडे, आशिष काळे, प्रभाकर तुलावी, गिरीधर तितराम, आशा तुलावी, रजनीकांत मोटघरे, परसराम टिकले, शेतकरी नेते श्याम मस्के आदींनी केले.

महावितरणच्या अधिकाऱ्यांवर रोष

आंदोलनस्थळी आलेले गडचिरोली येथील महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता मेश्राम यांना रोषाचा सामना करावा लागला. कुरखेडा येथील उपविभागीय वीज अभियंता मिथुन मुरकुटे व कढोली येथील शाखा अभियंता झोडापे यांच्याविरोधात तिव्र रोष होता. मात्र ते आंदोलनस्थळी फिरकलेच नाही. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात येत असल्याने पेच निर्माण झाला होता. अखेर उपस्थित कार्यकारी अभियंता यांच्याशी मोबाईलवर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी संवाद साधला. या संवादात तालुक्यात संध्याकाळी 6 ते सकाळी 6 या कालावधीत भारनियमन करण्यात येणार नाही, तसेच दिवसा फक्त 4 तास कृषी पंपाचे भारनियमन करण्यात येईल, अशी ग्वाही वीज अभियंत्यांनी दिली. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.