गडचिरोलीत ७४२ नव्हे, आता ९१२ जागांसाठी होणार पोलिस भरती

धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नांना यश

ना.धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन देताना पोलिस बॅाईज, सोबत तनुश्री आत्राम.

गडचिरोली : जिल्हा पोलिस दलाच्या भरती प्रक्रियेसाठी काही दिवसांपूर्वी जाहीरात प्रकाशित झाली होती. त्यात एकूण 742 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार होती. परंतू आता आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि खुल्या प्रवर्गाच्या जागा वाढवून 912 जागांसाठी ही भरती होणार आहे. ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी यासाठी पुढाकार घेतला.

आधी सुरू केलेल्या भरती प्रक्रियेनुसार गडचिरोलीत पोलिस शिपाई पदाच्या 742 जागा भरल्या जाणार होत्या. मात्र त्यात आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि खुल्या प्रवर्गाला संधी नसल्याने अनेक होतकरू तरुण भरतीत सहभागी होण्यापासून वंचित राहिले असते. ही बाब गडचिरोली पोलिस बॉईज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांनी अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी याचे गांभिर्य लक्षात घेत गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहिती देऊन आर्थिकदृष्ट्या कमकुवत तसेच खुल्या प्रवर्गाला संधी देण्याची विनंती केली.

गृहमंत्र्यांनी याची दखल घेत ईडब्ल्यूएस 50, खुला प्रवर्ग 70, एसीबीसी 50 अशी एकूण 170 जागांची वाढ केली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील तरुण-तरुणींच्या नोकरीची संधी
आणखी वाढली आहे.

या निर्णयाचे पोलिस बॉईज असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष गिरीश कोरमी, उपाध्यक्ष आकाश ढाली, कार्यकारी अध्यक्ष रजत कुकुडकर, प्रंतोष विश्वास, रणजित रामटेके, निखिल बारसागडे, अशुतोष चांगलानी आदींनी स्वागत करत ना.आत्राम यांचे आभार मानले.