गडचिरोली : सध्या चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा एक सामान्य विषाणू आहे. कोरोनाप्रमाणे तो खूप हाणीकारक नाही. मात्र कोरोनाप्रमाणे थोडी दक्षता घेतल्यास त्यालाही दूर ठेवणे शक्य आहे. नागरिकांनी त्याची भिती न बाळगता या संसर्गापासून बचावासाठी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात या विषाणूची लागत झालेला एकही रुग्ण अद्यापर्यंत नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.माधुरी किलनाके यांनी स्पष्ट केले.
एचएमपीव्ही श्वसन मार्गाच्या वरील भागातील संसर्गास कारणीभूत ठरतो. हा हंगामी रोग असून हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला सामान्यत: आरएसव्ही आणि फ्लू प्रमाणे उद्भवतो. सध्या चीनमध्ये एचएमपीव्ही या आजाराचे रुग्ण वाढल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र हा विषाणू सर्वप्रथम 2001 मध्ये नेदरलँडमध्ये आढळला होता.
सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष 2023 च्या तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तथापि खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने काही सूचना जारी केल्या आहेत.
काय करावे?
1. खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा तोंड आणि नाक, रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
2. साबण आणि पाण्याने आपले हात वारंवार धुवा.
3. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा.
4. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्न खा.
5. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या.
काय करू नये?
1. एकमेकांशी हस्तांदोलन
2. टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर
3. आजारी लोकांशी जवळचा संपर्क
4. डोळे,नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.
5. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.
6. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे.
वरील सूचनांचे पालन केल्यास या व्हायरसपासून आपल्याला संसर्ग टाळता येईल.