पोलिसांनी शोधून काढले 53 मोबाईल, कुणाचे हरवले, तर कुणाचे चोरले होते

संबंधित मोबाईलधारकांना केले वाटप

गडचिरोली : सध्या मोबाईलचा वापर प्रत्येकासाठी आवश्यक बाब झाली असल्याने मोबाईल हरवण्याचे किंवा चोरी जाण्याचेही प्रमाण वाढले आहे. गडचिरोली पोलिसांच्या सायबर शाखेने अशा 53 मोबाईलचा शोध लावत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते ते मोबाईल संबंधितांना सुपूर्द केले.

2 ते 8 जानेवारीपर्यंत पोलीस दलाच्या वतीने रेझिंग डे सप्ताह साजरा केला जातो. या कालावधील पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जातात. हरवलेल्या मोबाईलचे वाटपही त्याच उपक्रमांतर्गत करण्यात आले.

मोबाईल हरवला किंवा चोरीला गेल्यास त्या मोबाईलद्वारे सायबर गुन्हे घडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे हरवला किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक असते. या बाबींचा विचार करुन सायबर पोलीस स्टेशन ृमार्फत तांत्रिक कौशल्याचा वापर करुन हरवलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध लवकरात लवकर घेण्यात येतो.

मागील वर्षी (2024) एकुण 119 मोबाईलचा शोध घेण्यात आला. त्यांची अंदाजे किंमत एकुण 19 लाख 31 हजार रुपये एवढी होती. तसेच सप्टेंबर ते डिसेंबर 2024 या चार महिन्यांच्या कालावधीत हरविलेल्या व चोरीस गेलेल्या 53 मोबाईलचा शोध घेऊन संबंधित तक्रारदारांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलवुन ते सुपुर्द करण्यात आले. त्यांची अंदाजे किंमत 8 लाख 55 हजार रुपये आहे.

सायबर गुन्हेगारांपासून सावध राहा

यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले की, सध्या सायबर गुन्ह्रांचे प्रमाण वाढत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केली जाते. यासोबतच डिजीटल अरेस्टद्वारे व आर्टीफिशियल इंटीलेजन्स (AI) च्या सहाय्याने कोणाच्याही संवेदनशिल फोटोंना एडीट करुन लोकांची फसवूणक केली जाते. त्यामुळे जनतेने सायबर गुन्हेगारांपासुन सावध राहावे. आपली ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली असेल तर 1930 या नंबरवर तक्रार नोंदवावी व मोबाईल चोरी झाला असेल तर तात्काळ ceir.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी. तसेच मोबाईल कुठे हरवल्यास किंवा चोरी झाल्यास न घाबरता पोलिसांवर विश्वास ठेवुन तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशन, मदत केंद्रात किंवा सायबर पोलीस स्टेशनकडे संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.