गडचिरोली : अमरावती येथील श्री शिवाजी संस्थेच्या डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात स्व.माणिकराव घवळे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत गडचिरोलीच्या तुषार दुधबावरे याने उत्कृष्टपणे बाजू मांडत उत्कृष्ट वादविवादपटू वक्ता या म्हणून सन्मान मिळवला.
‘राजकीय स्वार्थासाठी दिल्या जाणाऱ्या योजना लोकशाहीस घातक आहे’ असा या स्पर्धेचा विषय होता. या स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील तुषार रमेश दुधबावरे याने गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागाचे प्रतिनिधीत्व केले. त्याला अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.पांडुरंग फुंडकर यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.
व्याख्यानमालेच्या बाबतीत राज्यात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत विविध जिल्ह्यातील, विविध विद्यापीठांचे प्रतिनिधी म्हणून एकूण 68 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. तुषार दुधबावरे याने प्रा.डॉ सविता गोविंदवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाज व ग्रामीण भागातील समाज आणि त्यांच्या रोज उद्भवणाऱ्या समस्यांची वास्तविकता व शासनाच्या योजनांची सांगड’ या विषयाला घेऊन आत्मविश्वासपूर्वक मत मांडले.