गडचिरोली : गडचिरोलीचे आमदार डॅा.देवराव होळी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. चामोर्शी तालुक्यातील कुरुड येथील शेतामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना अशा विविध योजनांबाबत मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या त्याबाबत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून चामोर्शी तालुक्यातील काही शेतकरी वगळण्यात आले आहेत. अजूनही गरजू शेतकऱ्यांचा त्यात समावेश करण्यात न आल्याने या शेतकऱ्यांनी डॅा.होळी यांच्याकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर आमदारांनी तहसीलदारांना सूचना दिल्या.
दरम्यान ‘संपर्क ते समर्थन’ अभियानांतर्गत होळी यांनी नेताजीनगर येथेही शेतकरी व इतर नागरिकांशी संवाद साधला. योग्य दराने खतपुरवठा करा, वाढीव दराने खत पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे सांगत आ.होळी यांनी पंतप्रधान कृषी सन्मान योजनेअंतर्गत रक्कम खात्यात जमा झाल्याची खातरजमा केली. व्यापारी नॅनो युरिया खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करत असल्याची, तसेच वाढीव दराने युरिया मिळत असल्याची तक्रार केली. यावर डॉ.होळी यांनी या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करणार असल्याचे सांगितले.
अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा व नुकसानभरपाई तात्काळ देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. यावेळी माजी सरपंच अनिता रॉय, बुधाराम बिश्वास, अजय घोष, तरुण कर्मकार, गोपाल हलधर, रविन चक्रवर्ती, अमीन घोष, दिलीप गाईन, गौतम दास, मलिन डे, सबोध पाल, दिलीप सिकदार, शेखर बैद्य, शांती बारई आदि उपस्थित होते.