गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राकरीता विशेष आर्थिक मदत द्या- खा.किरसान

अध्यक्ष म्हणाले, हा तर राज्याचा विषय

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊन संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. बऱ्याच ठिकाणी रस्ते, पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे, लोकांना आरोग्याच्या आणि इतर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. घरांचे आणि शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. ही सर्व विदारक परिस्थिती सभागृहात मांडून खा.डॅा.नामदेव किरसान यांनी विकासात्मक कामांसाठी गडचिरोली जिल्ह्याला विशेष आर्थिक मदत जाहीर करण्याची विनंती केली. पण लोकसभेच्या अध्यक्षांनी त्यांना हा राज्याचा विषय असल्याचे सांगत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र किरसान यांनी आपले म्हणणे पूर्ण केले.

खा.डॉ.किरसान यांचे भाषण चालू असताना हा विषय राज्य सरकारचा आहे, राज्य सरकाकडे मागणी करा असे म्हणत लोकसभा अध्यक्षांनी त्यांना टोकले, परंतु किरसान यांनी जिल्ह्यात सतत होणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे सांगून निर्माण झालेल्या स्थितीशी अध्यक्षांना अवगत केले. रुग्णाला 18 किलोमीटर कावड करून नेणे, गर्भवती महिलेला नाला ओलांडण्यासाठी जेसीबीची मदत घेणे या स्थितीमुळे केंद्राकडून गडचिरोली जिल्ह्याला सरळ दरवर्षी 10 हजार कोटीची तरतूद अर्थसंकल्पात कारण्यात यावी व यासाठी एका डेव्हलपमेंट बोर्डाची स्थापना करावी, अशी विनंती त्यांनी अध्यक्षांकडे केली.

दरम्यान सत्ताधारी भाजपकडून लोकसभा अध्यक्षांच्या माध्यमातून विरोधी पक्षातील खासदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्णणवाडे यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यातील समस्यांकडे त्यांचे लक्ष नाही, असे ब्राह्मणवाडे म्हणाले.