गडचिरोली : महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, विनाअनुदानित शाळा कृती समिती व शिक्षक समन्वय संघ गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला माजी खा.अशोक नेते यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. एवढेच नाही तर त्यांच्या मागण्या शासन दरबारी लावून धरण्याचे आश्वासन दिले.
अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दि.1 जानेवारी 2024 पासून विनाअट प्रतिवर्षी पुढील टप्पा लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी हे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाला माजी खासदार तथा भाजप अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी भेट देऊन त्यांचे निवेदन स्विकारले. यावेळी त्यांच्या समस्या जाणून घेत शिक्षक संघाच्या मागण्या मी शासन दरबारी पोहोचवेल असे आश्वस्त केले. एवढेच नाही, तर त्या मागण्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून त्या मागण्या पुर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासित केले.
याप्रसंगी प्रामुख्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे, भाजपा सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, शिक्षक संघाचे अध्यक्ष मुरली कवाडकर, कार्याध्यक्ष नरेंद्र बोरकर, सचिव मुरलीधर नागोसे तसेच शाळा कृती समितीचे पदाधिकारी, शिक्षक संघ तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.