गडचिरोली : गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात सुरू असलेल्या वादळी वारा, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी धान व मका पिकाला जोरदार फटका बसला आहे. त्यामुळे खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी चामोर्शी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.

वैनगंगा नदी काठावरील कुनघाडा, फराडा परिसरात अनेक शेतकरी उन्हाळी सिंचनाची सोय असल्याने धान व मका पिकाची लागवड करीत असतात. परंतु सतत तीन ते चार दिवस झालेल्या वादळी वारा व गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला गेला आहे. ऐन कापणी व मळणीला आलेल्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे. बँकेकडून कर्ज घेवून उन्हाळी धानाची लागवड केलेले शेतकरी अडचणीत आले आहेत.
अशातच गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खासदार डॅा.नामदेव किरसान यांनी चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा, फराडा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जावून पाहणी केली. नुकसानभरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार अशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली. यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, तालुका काँगेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद भगत, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, पर्यावरण सेलचे अध्यक्ष राजेश ठाकूर, अविनाश चलाख, सरपंच सुदर्शन हजारे, उपसरपंच नुमचंद भिवणकर, आशिष मशाखेत्री, आशिष घेर, कुणाल आभारे, राणी देशमुख, चंपत उंदिरवाडे, योगराज मडावी, विजय लाड, पांडुरंग टिकले, अशोक वासेकर, दीपक भांडेकर, दशरथ नैताम, अतुल भांडेकर, गणेश दूधबळे, घनश्याम भांडेकर, बारीकराव सुरजगाडे, रमेश कोठारे, साहिल वडेट्टीवार, गणेश सुरजागडे, हरिश्चंद्र सुरजागडे, दादाजी दूधबळे, सुधीर गिरीसावडे यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी, संबंधित विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.

































