कमलापूर आरोग्य केंद्राचे रूप पालटणार, ७ कोटींच्या निधीतून उभारणार इमारत

धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन

अहेरी : तालुक्यातील कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जीर्ण इमारतीत रुग्णांची गैरसोय होत आहे. दूरवरच्या भागातील आदिवासी बांधवांना सुसज्ज इमारतीत, योग्य उपचार मिळावेत या हेतूने राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी तब्बल ७ कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. त्यातून येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुतन इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे आता कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूप पालटणार आहे.

अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त म्हणून कमलापूरची ओळख आहे. या परिसरात अनेक खेड्यांचा समावेश आहे. या भागातील आदिवासी बांधवांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून १९८० मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली होती. ही इमारत अक्षरशः मोडकळीस आली आहे. जीर्ण अवस्थेत असलेल्या इमारतीतूनच रुग्णांवर उपचार केले जात होते. त्यामुळे मागील काही वर्षांपासून नुतन इमारत बांधकाम करण्याची मागणी केली जात होती.

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दखल घेऊन नुतन इमारत बांधकामासाठी तब्बल ७ कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. ४४ वर्षानंतर या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुतन इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत असल्याने या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

उदघाटनप्रसंगी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे गावात आगमन होताच ढोलताश्यांच्या गजरात पुष्पगुच्छ देऊन गावकऱ्यांनी स्वागत करून आभार मानले.

या भूमिपूजनप्रसंगी माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, माजी पं.स. सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, राकॉचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, जेष्ठ कार्यकर्ते श्रीकांत मद्दीवार, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण वानखेडे, डॉ राजेश मानकर, माजी उपसरपंच शंकर आत्राम, विद्यमान उपसरपंच सचिन ओलेटीवार, श्रीधर दुग्गीरालापाटी, कृष्णा कीर्तीवार, सतीश दैदावार, संदीप रेपालवार, विनोद ओलेटीवार, वेंकटी उलेंदला, स्नेहदीप आत्राम तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भागातील नागरिकांना मिळणार लाभ

कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत रेपनपल्ली, दामरंचा, भंगारमपेठा, कोरेपल्ली, छलेवाडा, गुडीगुडम, मोसम, मांड्रा, खांदला हे ९ उपकेंद्र आणि राजाराम येथील एका आरोग्य पथकाचा समावेश आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राची एकूण लोकसंख्या १९ हजार ४२६ एवढी आहे. उपकेंद्रात रुग्णांवर योग्य उपचार न झाल्यास कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागते. एवढेच नव्हे तर परिसरातील रुग्ण, आश्रमशाळेतील विध्यार्थ्यामुळे या ठिकाणी ओपीडी व्यतिरिक्त २४ तास उपचार केले जातात. सुसज्ज इमारत झाल्यास या भागातील रुग्णांना लाभ मिळणार आहे.