महिनाभरापासून लिंक नाही, दोष कुणाचा माहीत नाही

पोस्टाच्या कारभाराने त्रासले गडचिरोलीकर

गडचिरोली : सद्यस्थितीत कोणत्याही सरकारी कार्यालयात इंटरनेटशिवाय कोणतेही काम होत नाही. अगदी ग्रामपंचायतच्या रेकॅार्डचेही संगणकीकरण झाले आहे. पण दळणवळणाच्या सुविधेतील एक महत्वाचे माध्यम असणाऱ्या भारतीय डाक सेवेच्या गडचिरोलीतील कार्यालयाला गेल्या महिनाभरापासून ‘लिंक फेल’च्या समस्येने ग्रासले आहे. हे कार्यालय आणि त्याला इंटरनेट सेवा पुरविणारी बीएसएनएल ही कंपनी दळणवळण या एकाच विभागाशी निगडीत आहे. पण आश्चर्य म्हणजे ही समस्या दूर महिनाभरापासून दूर होऊ शकली नाही. याचा फटका दररोज शेकडो नागरिकांना सहन करावा लागत आहे.

भारतीय डाक सेवेअंतर्गत अनेक प्रकारची कामे आॅनलाईन पद्धतीने चालतात. आता पोस्ट खात्यातील ठेवींवर अधिक व्याजदर असल्याने ज्येष्ठ नागरिकांसोबत इतरही नागरिक पोस्टाच्या बँकेत व्यवहार करू लागले आहेत. रेल्वेचे तिकीट काढण्याची सुविधाही पोस्टात आहे. परंतू महिनाभरापासून दररोज लिंक फेलचे उत्तर एेकावे लागत असल्याने नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक महत्वाची कामे बाहेर जाऊन करावी लागत असल्याची व्यथा तेथील कर्मचारी सांगतात.

विशेष म्हणजे यासंदर्भात वारंवार तक्रारीही करून झाल्या. पण या समस्येला ना पोस्टाचे चंद्रपूर येथील मुख्य डाकपाल गांभिर्याने घेत आहे, ना बीएसएनएलचे अधिकारी. आमचा दोष नाही, असे म्हणत एकमेकांकडे बोट दाखविले जात आहे. या बेजबाबदार कारभाराला सुधारण्यासाठी आता या दोन्ही विभागांचे कान जिल्हा प्रशासनाने टोचावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.