अन् लेडी ड्रायव्हर किरणचा इंग्लंडमध्ये उच्चशिक्षण घेण्याचा मार्ग झाला मोकळा

काय आहे किरणची स्टोरी, वाचा...

गडचिरोली : गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यातील अर्ध्याअधिक नागरिकांनी शिक्षणासाठी जिल्ह्याच्या बाहेर पाऊलसुद्धा ठेवलेले नाही, पण सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा या दुर्गम भागातील लेडी ड्रायव्हर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किरण कुर्मावार हिने थेट इंग्लंडमध्ये उच्चशिक्षण घेण्याचे स्वप्न पाहिले. नुसतेच स्वप्न पाहिले नाही तर गेल्या ६ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून ती त्यासाठी लागणाऱ्या शासकीय आर्थिक मदतीसाठी धडपड करीत आहे. अखेर तिच्या या प्रयत्नांना यश आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिची तळमळ समजून घेऊन समाजकल्याण विभागातून तिला इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी लागणारी शिष्यवृत्ती देण्याचे निर्देश देत तिच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा केला.

सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा या दुर्गम गावातील रहिवासी असलेली किरण (२४ वर्ष) या महत्वाकांक्षी युवतीने हैदराबाद येथून अर्थशास्रात एमए पर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे काही दिवस वेगवेगळ्या ठिकाणी खासगी नोकरीही केली. पण प्रवासी टॅक्सी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या तिच्या वडीलांचा अपघात झाल्यानंतर बरेच दिवस ते टॅक्सी चालवू शकले नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या विवंचनेत किरण हिने वडीलांच्या टॅक्सीचे स्टेअरिंग हाती घेतले आणि खराब रस्त्यांवरून लिलया गाडी चालवत ती कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावू लागली. तिच्या या धाडसासाठी अनेक संस्थांनी तिचा विविध पुरस्कार देऊन सत्कारही केला. पण किरण त्यात समाधानी नव्हती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पोलीस दलातील चालक पदाच्या भरतीसाठीही तिने प्रयत्न केले, मात्र थोडी उंची कमी पडली आणि या नोकरीनेही तिला हुलकावणी दिली.

दरम्यान उच्चशिक्षण घेऊन काहीतरी करून दाखविण्याची महत्वाकांक्षा किरणला स्वस्थ बसू देत नव्हती. यातच तिने इंग्लंडची राजधानी लंडन येथे इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट या एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी अर्ज केला. पण त्यासाठी ४० लाखांचा खर्च असल्याचे तिला कळविण्यात आले. केवळ सरकारी शिष्यवृत्ती मिळाली तरच हे स्वप्न पूर्ण होऊ शकते हे तिला माहीत होते. समाजकल्याण विभागातून एवढी शिष्यवृत्ती मिळणार नाही असे तिला सांगण्यात आले. काहींनी मदतीचा हातही पुढे केला, पण त्यातूनही भागणार नव्हते. अखेर तिने निराश न होता थेट मुंबईच गाठली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत ती आपली कैफियत घेऊन पोहोचली. मुख्यमंत्र्यांनी तिची तीव्र ईच्छा आणि ती ज्या परिस्थितीतून आली ते पाहून लगेच समाजकल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे यांना शिष्यवृत्ती देण्याची सूचना केली. भांगे यांनी किरणचा प्रस्ताव तत्काळ मंत्रालयात पाठविण्याचे निर्देश गडचिरोलीच्या समाजकल्याण अधिकाऱ्यांना दिले. ३१ जुलैपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन किरणचा लंडनमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.