गडचिरोली : तालुक्यातील मुरमाडी येथे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले आरोग्यवर्धिनी उपकेंद्र संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नेहमी बंद राहात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना उपचारासाठी गडचिरोली गाठावी लागते. या आरोग्य उपकेंद्राला वाऱ्यावर सोडणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्री वेळदा यांनी केली आहे.
मुरमाडी परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा योग्य वेळी मिळाव्यात यासाठी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून सदर आरोग्यवर्धिनी उपकेंद्राची निर्मिती केली. मात्र या उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी नियमित हजरच राहात नसल्याने परिसरातील नागरिकांना आरोग्यविषयक लहानसहान तक्रारींसाठी गडचिरोली शहराकडे उपचारासाठी धाव घ्यावी लागते.
उपकेंद्रातर्गत केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, बैठका, कार्यशाळा यासाठीच या उपकेंद्राचा वापर होत असून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेच्या देखभालीसाठीही या उपकेंद्रात कोणती तरतूद केली गेली नाही. त्यामुळे हे उपकेंद्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे वाऱ्यावर असल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षातर्फे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात जयश्री वेळदा यांनी केला आहे.
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करुन सदर आरोग्यवर्धिनी उपकेंद्र तातडीने नियमितपणे सुरू करण्यात यावे, अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.