आमदार होळी यांनी केली पूरग्रस्त राजोली-पोटेगाव भागात पाहणी

पुनर्वसनावर भर, तातडीने सानुग्रह अनुदान मिळणार

गडचिरोली : गेल्या आठवडाभरात जिल्ह्याच्या सततच्या पावसामुळे अनेक भागात पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. गडचिरोली तालुक्यातील राजोली, पोटेगाव या गावांनाही पुराच्या पाण्याचा फटका बसला. आमदार डॅा.देवराव होळी आणि तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी शनिवारी या पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला. राजोलीवासियांच्या पुनर्वसनासोबत त्यांना तीन महिने मोफत धान्य आणि सिलींडरही देण्याची मागणीवजा सूचना आ.डॅा.होळी यांनी केली.

गावालगतच्या नदीचे पाणी गावात शिरल्याने राजोली येथे अनेक लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने या गावाचे पुनर्वसन करून लोकांना तातडीनं आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली. डॅा.होळी यांनीही त्याला दुजोरा देत हा प्रश्न शासन दरबारी मांडणार असल्याचे सांगितले. सदर प्रश्न आपण विधानसभेत उचलणार असून गावच्या लोकांना सर्वतोपरी मदत मिळेल यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

तहसीलदार गणवीर यांना यावेळी तातडीने मदत वाटपासाठी प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना आमदारांनी केली. घरांच्या नुकसानीचे पंचनामे झाले असून आता शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहे. येत्या दोन दिवसात नुकसानग्रस्त नागरिकांना प्रतिकुटुंब पाच हजारांचे सानुग्रह अनुदान दिले जाईल, अशी माहिती तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी दिली.