गडचिरोली : गडचिरोलीतील सुशिक्षित भजगवळी कुटुंबातील तेजस (२४) या युवतीचा २६ सप्टेंबर रोजी मुंबईत उपचारादरम्यान रिअॅक्शन येऊन मृत्यू झाला. तिच्या मृत्यूसाठी कारणीभूत असणाऱ्या डॅाक्टर आणि संबंधित तांत्रिक कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृतक तेजस भजगवळीच्या कुटुंबियांनी येथे पत्रपरिषदेत केली.
मुंबईच्या कल्याण भागातील रुक्मिणीबाई हॅास्पिटलअंतर्गत क्रस्ना लॅबमध्ये तेजस तांत्रिक कर्मचारी म्हणून कार्यरत होती. तिचे डोके दुखत असल्याने उपचारासाठी ती जे.जे.रुग्णालयात गेली. संबंधित डॅाक्टरांनी सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तेजस क्रस्ना लॅबमध्ये २६ सप्टेंबर रोजी गेली. मात्र संबंधित टेक्निशियन यांनी अधिकृत रेडिओलॅाजिस्ट उपस्थित नसताना तेजसला कॅान्टॅक्ट डॅाय दिले आणि सीटी स्कॅन केले. परंतू त्याची रिअॅक्शन होऊन तिच्या शरीरावर सुज येऊ लागली. तिने आपल्या मित्राला याबाबत फोनवर सांगितले. रिअॅक्शन आल्यानंतर कोणतेही प्रतिबंधात्मक उपाय न केल्याने तेजसचा मृत्यू झाला असा आरोप तेजसची बहिण डॅा.प्रणाली भजगवळी यांनी केला.