रासेयोचे अधिकारी व स्वयंसेविकेने उंचावली गोंडवाना विद्यापीठाची मान

बघा राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमाची झलक

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या चामोर्शी येथील केवळरामजी हरडे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे (रासेयो) कार्यक्रम अधिकारी व विभागीय समन्वयक डॉ.पवन नाईक आणि याच महाविद्यालयातील जानव्ही पेद्दीवार यांना उत्कृष्ट रासेयो स्वयंसेविका म्हणून सन २०२१-२२ चा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर मिळाला. राष्ट्रपती भवनात शुक्रवारी झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. एकाच वेळी रासेयोचे दोन राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे गोंडवाना विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एकमेव विद्यापीठ ठरले आहे.

समाजाप्रती करण्यात आलेल्या या दोघांच्याही कार्याने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातच नाही, तर महाराष्ट्रातही छाप सोडली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या पुरस्काराकरिता एक कार्यक्रम अधिकारी आणि दोन रासेयो स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. दुसरा स्वयंसेवक हा औरंगाबादच्या महाविद्यालयातील आहे.

गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशान्त बोकारे, प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.पवन नाईक व रासेयो स्वयंसेविका जानव्ही पेद्दीवार, तसेच रासेयो संचालक डॉ.श्याम खंडारे आणि गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले.