माना जमातीला अनुसूचित जमातीमधून वगळण्याबाबतचे वक्तव्य काँग्रेसच्या अंगलट

माना आदिम जमात मंडळाने केला निषेध

गडचिरोली : काँग्रेसचे सरकार आल्यास माना जमातीला अनुसूचित जमाती प्रवर्गातून वगळणार, अशा आशयाचे वक्तव्य माजी सामाजिक न्यायमंत्री आणि काँग्रेसच्या आदिवासी सेलचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे यांनी केले. त्या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षाने माना समाजाची नाराजी ओढवून घेतली आहे. माना आदिम जमात मंडळाने त्या वक्तव्याचा आणि त्यावेळी तिथे उपस्थित गडचिरोली जिल्ह्यातील नेत्यांनी कोणताही आक्षेप न घेतल्याने त्यांचाही निषेध माना समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

माना जमात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी गडचिरोलीत पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. आदिवासी क्षेत्रबंधन मुक्ती दिवस समारंभात १८ सप्टेंबर रोजी नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात काँग्रेस नेते शिवाजीराव मोघे यांनी ते वादग्रस्त वक्तव्य केले होते.

यासंदर्भात बाळकृष्ण सावसाकडे म्हणाले, माना ही स्वतंत्र मूळ आदिवासी जमात आहे. कुठल्याही आदिवासीची पोटशाखा नाही. घटनेच्या ३४२ कलमानुसार आदिवासींच्या यादीमध्ये सन १९५६ मध्ये क्रमांक १२ वर होती. त्यानंतर १९७६ मध्ये क्षेत्रबंधन हटवून लोकसभेत सुधारित आदेश पारित करून महाराष्ट्राच्या आदिवासी अनुसूचित यादीमध्ये माना जमातीची अनुक्रमे क्रमांक १८ वर नोंद करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने सर्व कायदेशिर निर्णय माना जमातीच्या बाजुने दिलेले आहेत, अशी माहिती सावसाकडे यांनी दिली.

यावेळी गोविंद सावसाकडे, अॅड.वामनराव नन्नावरे, वसंत चौधरी, गोपाल मगरे, पत्रुजी घोडमारे, ईश्वर नन्नावरे, शत्रुघ्न नन्नावरे आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.