शिक्षक देता की, शाळेला कुलूप ठोकायचे? कोटगुलच्या पालकांचा संतप्त इशारा

जि.प.प्रशासन दखल घेणार का?

कोरची : तालुका मुख्यालयापासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या कोटगुल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ११५ विद्यार्थ्यांसाठी पाच शिक्षकांच्या जागा मंजूर आहेत. पण सध्या तीनच शिक्षक कार्यरत आहेत. त्या तीन शिक्षकांपैकी एक वैद्यकीय रजेवर आहे. त्यामुळे दोन शिक्षक विद्यार्थ्यांना कसे सांभाळणार आणि शिक्षण कसे देणार, असा प्रश्न उपस्थित करत पालकवर्गाने तातडीने शिक्षकांची नियुक्ती करा, अन्यथा शाळेला कुलूप ठोकू, असा इशारा दिला आहे.

पालकांनी शिक्षकांची ही अडचण पत्राद्वारे कोरची पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांना कळविली. परंतु दोन वेळा निवेदन देऊनसुद्धा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. २२ ऑगस्टपर्यंत शिक्षक देणार असे आश्वासन मिळाले होते, मात्र अद्यापही शिक्षकांची नियुक्ती झालेली नाही.

जर मुलांचा प्राथमिक शाळेत जर योग्य शिक्षण मिळाले नाही तर भविष्यात त्यांचे नुकसान होईल अशी चिंता व्यक्त केली आहे. काही पालक मोलमजुरी करून, शेतमजुरीतून आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण व्हावे व ते भविष्यात गरिबीच्या परिस्थितीतून बाहेर पडावेत म्हणून रक्ताचे पाणी करून आपल्या मुलांना शिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गरिबीमुळे मुलांना कुठे बाहेर शिक्षणाला पाठवण्याची ऐपत नसल्यामुळे त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही. यामुळे जिल्हा परिषद प्रशासन याची दखल घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.