Home पब्लिक प्रॉब्लेम अहेरीवरून गडचिरोलीकडे निघालेली बस अंधारात रस्त्यातच पडली बंद

अहेरीवरून गडचिरोलीकडे निघालेली बस अंधारात रस्त्यातच पडली बंद

जुन्या बसगाड्यांमुळे प्रवाशांना मनस्ताप

अहेरी : अहेरीवरून गडचिरोलीकडे निघालेली एसटी महामंडळाची बस अहेरीपासून 18 किलोमीटर अंतरावर रस्त्यातच बंद पडली. सर्वत्र अंधार असताना पुढे जाण्यासाठी दुसरे कोणतीच सोय नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करत बराच वेळ तिथे अडकून पडावे लागले. अखेर अहेरीवरून दुसरी बस बोलवल्यानंतर प्रवाशी पुढील प्रवासासाठी निघाले.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य असले तरी अहेरी आगारात सध्या अनेक बसेस प्रवाशांना सेवा देण्यास कमी पडत आहे. बसगाड्यांची दुरावस्था झाल्यामुळे त्या कधी बंद पडतील याचा नेम नसतो. याचा अनुभव सोमवारी संध्याकाळी प्रवाशांनी घेतला. अहेरी आगारातील एमएच 07, सी 9077 क्रमांकाची अहेरी-गडचिरोली ही बस संध्याकाळी 6 वाजता निघाली होती. अहेरीवरून 18 किमी अंतरावर रस्त्याच्या मधोमध ती बस बंद पडली.

अहेरी आगारात जवळपास 80 टक्के बसेस जुन्या आहेत. त्यांची दुरूस्ती करण्यासाठी लागणारे सुटे भागही उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. म्हणूनच आगारातून निघाल्यावर बस मोठ्या प्रमाणावर बंद पडत आहेत. याचा नाहक त्रास प्रवाशांना होत आहे. किमान रात्रीच्या फेऱ्यांवर तरी चांगल्या गाड्या पाठवाव्या अशी अपेक्षा प्रवाशांकडून केली जात आहे.