चामोर्शी : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सदस्य नोंदणी मोहिमेअंतर्गत येथे विशेष कार्यशाळा घेण्यात आली. चामोर्शी तालुका ग्रामीण व शहर शाखेच्या वतीने आयोजित या कार्यशाळेत माजी खासदार तथा पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) अशोक नेते यांनी मार्गदर्शन केले.
नव्या सदस्यांना पक्षाच्या विचारसरणीशी परिचित करून देणे आणि अभियानाला गती देण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी अशोक नेते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, सदस्य नोंदणी अभियान ही भाजपसाठी फक्त संख्या वाढवण्याची प्रक्रिया नसून ती पक्षाच्या मूलभूत तत्त्वांना दृढ करण्याची संधी आहे. नवीन सदस्यांना पक्षाची कार्यपद्धती व विचारांची सखोल माहिती देऊन त्यांना पक्षाशी जोडणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी असल्याचे सांगितले. या अभियानाला अधिक गती देण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजूटता दाखवत या कामात झोकून देण्याचे आवाहन केले.
या कार्यशाळेला जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर, ज्येष्ठ नेते मनमोहन बंडावार, भाजयुमो जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, तालुका महामंत्री विनोद गौरकर, विष्णू ढाली, संजय खेडेकर, शहर महामंत्री नरेश अलसावार, आदिवासी जिल्हा महामंत्री रेवनाथ कुसराम, जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे प्रामुख्याने उपस्थित होते.