गडचिरोली : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ सोमवारी दोन दिवसीय गडचिरोली दौऱ्यावर आले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सर्व विभाग प्रमुखांसह व यंत्रणेकडून आकांक्षित जिल्हा म्हणून झालेल्या कामांचा आढावा घेतला. गडचिरोली जिल्ह्याला आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर काढण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांची व तत्परतेने काम करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील नव्या दमाच्या अधिकाऱ्यांच्या टीममुळे ही बाब लवकरच शक्य होईल, असा विश्वास सेठ यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांनी केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.
आकांक्षित जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनातर्फे संरक्षण राज्यमंत्री सेठ आले आहेत. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक निलोत्पल, खा.डॅा.नामदेव किरसान, आ.डॅा.मिलिंद नरोटे, आ.रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, तसेच अपर जिल्हाधिकारी विवेक घोडके, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे आणि सर्व उपविभागीय अधिकारी तथा विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
सेठ यांनी शिक्षणावर भर देताना जिल्ह्यातील शाळांची संख्या, विद्यार्थ्यांची उपस्थिती, मध्यान्ह भोजन योजना यावर माहिती घेतली. जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी पायाभूत सुविधा सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. कृषी विभागाचा आढावा घेताना जिल्ह्यात प्रमुख पिके कोणती, नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची काय सुविधा आहे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी काय करता येईल, किसान क्रेडिट कार्ड किती वाटप केले, किसान सन्मान योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना दिला, लाभ वाटपात काही अडचण आहे का, याबाबत त्यांनी विचारणा केली. शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाचे पाणी कसे उपलब्ध होईल, यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहेत व अधिक काय करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्यांनी विचारणा करून जिल्ह्याला आकांक्षित जिल्ह्याच्या यादीतून काढण्यासाठी शासनाकडून काय मदत हवी आहे, याबाबत अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती देण्याचे आवाहन केले. ही माहिती प्रधानमंत्री कार्यालयात सादर करण्यात येणार असून त्यामुळे जिल्ह्याला भरीव मदत उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत 92 टक्के उद्दिष्टपूर्ती केल्याबददल त्यांनी कौतुक करत उर्वरित कामे गतीने पूर्ण करण्याची सूचना दिली. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्याची माहिती दिली. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी नक्षलवाद संपवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. यावेळी खासदार आणि आमदारांनी संजय सेठ यांच्यासमक्ष जिल्ह्यातील विविध प्रश्न मांडले.
गोंडवाना विद्यापीठाच्या एकल केंद्राला भेट
आढावा बैठकीनंतर संजय सेठ यांनी गोंडवाना विद्यापीठातील प्रशिक्षण केंद्र व एकल सेंटरला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच कोटकल ग्रामपंचायतमध्ये भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात विविध योजना सुरू केल्या असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
कोटगल बॅरेजला भेट देवून तेथील कामाची पाहणी केली. सकाळी गडचिरोलीत दाखल झाल्यानंतर विश्राम भवनात येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी विकास कामांवर चर्चा केली. यावेळी खासदार डॉ.नामदेव किरसान, आमदार धर्मरावबाबा आत्राम, रामदास मसराम, डॉ.मिलींद नरोटे उपस्थित होते.