तैलिक महासंघाचा पाठिंबा महायुतीचे उमेदवार खा.अशोक नेते यांनाच राहणार

'त्या' संस्थांचा गडचिरोलीशी संबंध नाही, ऐका काय म्हणतात जिल्हाध्यक्ष

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा तेली समाजाच्या कोणत्याही संघटनेने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला नसून आमचा पाठिंबा महायुतीचे उमेदवार खासदार अशोक नेते यांनाच राहणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र तैलिक महासंघाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रमोद पिपरे यांनी यासंदर्भात पत्रपरिषद घेऊन माहिती दिली.

चंद्रपूर जिल्ह्यातील तेली समाजाच्या काही संघटनांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याची माहिती महाविकास आघाडीने प्रसार माध्यमांना दिली होती. परंतू चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या संघटनांची यादी त्यांनी दिली त्या समाजाच्या संघटना नसून संस्था आहेत. त्यांचा गडचिरोली जिल्ह्याशी कोणताही संबंध नाही. विशेष म्हणजे त्यातील काही संस्थांनी आपल्याला विश्वासात न घेताच परस्पर पाठिंबा जाहीर केल्याचे स्पष्ट केले असल्याचे पिपरे यांनी सांगितले.

महाराष्ट्र तैलिक महासंघ ही तेली समाजाची राज्यातील सर्वात मोठी संघटना आहे. या पक्षाचे राज्य अध्यक्ष हे वर्धेचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार रामदास तडस हे आहेत. आम्ही नेहमीच भाजपच्या पाठिशी राहिलो आहे. यावेळी भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना आमचा पाठिंबा राहिल, असे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रमोद पिपरे आणि उपस्थित इतर पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी तैलिक महासंघ तथा भाजपचे पदाधिकारी रमेश भुरसे, मुक्तेश्वर काटवे आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.