उन्हाळी धानाची कापणी-मळणी जोरात, व्यापारी करताहेत कमी भावात खरेदी

शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी

देसाईगंज : तालुक्यातील रबी (उन्हाळी) धान पिकाची मोठ्या प्रमाणात कापणी आणि मळणी सुरू आहे. मात्र शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न केल्याने मळणी केलेले धानपीक खासगी व्यापाऱ्यांना कमी भावात विक्री करावे लागत आहे.

देसाईगंज तालुक्यात सिंचनाची सोय असल्याने मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाचे उत्पादन घेतले जाते. सध्या अनेक शेतकऱ्यांकडून धान पिकाची कापणी व मळणी केली जात आहे. मात्र धान ठेवायला घरी जागा उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी कमी दरात खासगी व्यापाऱ्यांना तो विकत आहे. व्यापारी याचा फायदा घेत कमी दराने खरेदी करताना दिसतात.

शासनाने शेतकऱ्यांची लूट होऊ नये यासाठी लवकरात लवकर उन्हाळी धानासाठी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांनी केली आहे.