अखेर वडसा रेल्वे स्टेशनवर थांबली यशवंतपूर-कोरबा वैनगंगा एक्सप्रेस

खा.नेते यांनी दाखवली हिरवी झेंडी

रेल्वेगाडीला हिरवी झेंडी दाखवून रवाना करताना खा.अशोक नेते, आ.कृष्णा गजबे

देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या वडसा रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांची व प्रवाशांची वर्दळ असताना यशवंतपूर-कोरबा या वैनगंगा एक्स्प्रेसचा थांबा सुरू झालेला नव्हता. खा.अशोक नेते यांनी याबाबत रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर हा थांबा अखेर गुरूवार दि.१५ पासून सुरू झाला. यावेळी खा.नेते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या रेल्वेगाडीला वडसा स्थानकावरून रवाना करण्यात आले.

यावेळी आमदार कृष्णा गजबे, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, तालुका अध्यक्ष सुनील पारधी, तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, वसंत दोनाडकर, रेल्वे मंडळाचे अप्पर प्रबंधक टी.जगताप, मंडळाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक दिलीप सिंह, सहाय्यक प्रबंधक अविनाशकुमार आनंद, देसाईगंजच्या माजी नगराध्यक्ष शालू दंडवते, भाजपच्या चंद्रपूर ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी खा.नेते यांनी गाडीचे चालक व इतर कर्मचाऱ्यांना पेढे भरवून त्यांना शुभेच्छा दिल्या.

कोरोनाकाळात सुपरफास्ट व पॅसेंजर अशा सर्वच गाड्यांचा वडसा स्थानकावर थांबा बंद होता. नंतर कोरोनाचे नियम शिथिल झाल्यानंतर हळूहळू सर्व गाड्या चालू झाल्या. कोरोनाच्या अगोदर कोरबा-यशवंतपूर वैनगंगा सुपरफास्ट ट्रेनचाही थांबा देसाईगंज (वडसा) येथे होता. परंतु कोरानाकाळ संपल्यानंतरही हा थांबा बंदच होता. त्यामुळे रेल्वेच्या प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. अनेक दिवसांपासून स्थानिक व्यापारी, नागरिकांची आणि लांबच्या प्रवासावर जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची या गाडीला थांबा देण्याची मागणी होती. खा.नेते यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे वारंवार भेट घेऊन त्यांना रेल्वे प्रवाशांची समस्या सांगत या थांब्याची मागणी केली. अखेर त्यांनी ही मागणी मान्य केली.