छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आलापल्लीत शनिवारी महाआरोग्य शिबिर

'लॅायड्स'च्या सहकार्याने राष्ट्रवादीचे आयोजन

अहेरी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या 17 फेब्रुवारी रोजी आलापल्लीच्या क्रीडा संकुलात मोफत आरोग्य तपासणीसह भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ज्ञ डॅाक्टरांची चमू रुग्णांची तपासणी करणार आहे.

लॅायड्स मेटल्सच्या सहकार्याने आयोजित या शिबिराच्या आयोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. सकाळी 10 वाजता वाजता अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.दावल साळवे, अहेरी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॅा.कन्ना मडावी, अहेरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॅा.किरण वानखेडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष शाहीन हकिम, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. हे शिबिर सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणार असल्याचे आयोजकांनी कळविले.