वॅाटर लिफ्टिंग जनरेटरसाठी 7 वर्षांपासून रेल्वे प्रशासन करत आहे टाळाटाळ

आ.कृष्णा गजबे यांची डीआरएमकडे तक्रार

देसाईगंज : शहरातील नागरिकांना रेल्वेरूळ पार करून दुसऱ्या भागात जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाद्वारे तयार करून दिलेला अंडरब्रिज हा नागरिकांसाठी पावसाळ्याच्या दिवसात डोकेदुखीचा विषय झाला आहे. या ब्रिजच्या बोगद्यात पाणी साचत असल्याने त्यातून जाताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने दिलेल्या हमीप्रमाणे त्या पाण्याची विल्हेवाट तातडीने लावण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी आरमोरी क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली.

देसाईगंज शहर रेल्वे स्टेशनमुळे दोन भागात विभागल्या गेले आहे. रेल्वे वाहतुकीच्या वर्दळीमुळे रेल्वे फाटकाजवळ नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत होते. यावर उपाय म्हणून रेल्वेकडून अंडरब्रिज तयार करण्यात आला. देसाईगंज नगर परिषदेने विशेष ठराव घेवुन त्याच्या देखभाल, दुरुस्तीसह वीज पुरवठ्याचीही हमी घेतली. तर रेल्वे प्रशासनाने बोगद्यात साचणाऱ्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी वॉटर लिफ्टिंग जनरेटर लावुन देण्याची हमी घेतली होती. मात्र रेल्वे अंडरब्रिज तयार होऊन 7 वर्षाचा कालावधी होऊनसुद्धा रेल्वे प्रशासनाने वॉटर लिफ्टिंग जनरेटरची सुविधा करून दिली नाही. त्यामुळे नागरिकांना रहदारीसाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांच्या रोषाला नगर प्रशासनाला सामोरे जावे लागत आहे. सध्या रेल्वे स्थानकावर कोट्यवधीची विकासकामे सुरु आहेत. पण अंडरब्रिजमधील पाण्याचा निचरा करण्याची कोणतीही सुविधा रेल्वे प्रशासनाने केलेली नाही. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या हमीप्रमाणे वॉटर लिफ्टिंग जनरेटरची तात्काळ सुविधा करून द्यावी, अशी मागणी आमदार गजबे यांनी मुख्य रेल्वे प्रबंधक नम्रता त्रिपाठी यांना भ्रमणध्वनीवरून केली. साचलेल्या पाण्यामुळे होणाऱ्या गैरसोयीचे व्हिडीओ चित्रीकरणही मुख्य रेल्वे प्रबंधकांना पाठविण्यात आले.

रेल्वे स्टेशन मास्टरसोबत चर्चा करताना देसाईगंज न.प.चे माजी उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा यांचेसह भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजू जेठानी, सोपाल अग्रवाल यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.