देसाईगंज : गावालगतच्या तलावावर गंमत म्हणून आपल्या मित्रांसोबत मासे पकडण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी कोंढाळा येथे घडली. वंश विजय भुते (८ वर्ष) असे मृत मुलाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार,वंश आपल्या घराशेजारील काही अल्पवयीन मुलांसोबत दुपारच्या सुमारास गावालगत असलेल्या तळ्यावर मासे पकडण्यासाठी गेला होता. काही वेळानंतर सोबतची मुले घरी परतली. पण वंश एकटाच तलावाजवळ होता. दरम्यान 4.30 वाजताच्या सुमारास गावातील काही नागरिक सतत पडणाऱ्या पावसामुळे गावतळे पाण्याने किती भरले आहे हे पाहण्यासाठी गेले असता तलावात एका मुलाचा मृतदेह तरंगताना दिसून आला. याशिवाय तलावाच्या काठावर शालेय गणवेश आढळून आला.
याची माहिती गावातील पोलीस पाटील किरण कुंभलवार यांना देण्यात आली. त्यांनी लगेच ही माहिती देसाईगंज पोलिसांना दिली. त्यानंतर पाण्यावर तरंगणाऱ्या मुलाला बाहेर काढले असता त्याची ओळख पटली. देसाईगंज ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक चौधरी, हवालदार सतीश ठाकरे, मानकर व नंदेश्वर यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. मुलाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला. पुढील तपास ठाणेदार अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंज पोलीस करीत आहे.
वंश हा गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत तिसऱ्या वर्गात शिकत होता. त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.