गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा (रै), तळोधी (मो) आणि नवेगाव (रै) या तीन ग्रामपंचायतसाठी असलेली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना नादुरूस्त असल्याने महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत. एकूण १० गावांना या योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. परंतू योजनेच्या दुरूस्तीसाठी निधी नसल्याचे सांगत एकमेकांकडे बोट दाखविले जात असल्यामुळे भर पावसाळ्यात शुद्ध पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.
कुनघाडा (रै) येथील नागरिकांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व संबंधितांना निवेदन दिले. तसेच पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली. नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा येत्या २८ आॅगस्टला गडचिरोली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
अविनाश चलाख यांच्यासह गावातील नागरिकांनी याबद्दल पत्रकारांना माहिती दिली. १९९५ मध्ये वैनगंगा नदीवर उभारण्यात आलेली ही पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत चालविली जाते. परंतू शासनाने जलजीवन मिशनअंतर्गत केवळ नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी निधी दिला असल्याने जुन्या योजनांच्या देखभाल, दुरूस्तीसाठी निधी नसल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे योजनेच्या दुरूस्तीसाठी निधीची समस्या निर्माण झाली आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींनाही माहिती दिली, परंतू कोणीच लक्ष दिले नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला.